महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील माजी विद्यार्थिनींचा मेळावा दि. २८ व २९ डिसेंबर २०१९ रोजी शाळेमध्ये उत्साहात पार पडला. सैनिकी शाळा ही एक सक्षम स्त्री घडविणारी आशिया खंडातील पहिली मुलींची सैनिकी शाळा आहे. येत्या काही वर्षात शाळा २५ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. याचे औचित्य साधून माजी विद्यार्थिनींचा निवासी मेळावा शाळेमध्ये आयोजित करण्याचे ठरवले. पहिल्यांदाच अशा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या एकूण २५ माजी विद्यार्थिनी या मेळाव्यास उपस्थित होत्या. रायफल शूटिंग, आर्चरी, खेळ, शेकोटी, अनुभव कथन, गप्पागोष्टी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यकाळात शाळेसाठी आपण कोणत्याप्रकारे योगदान देऊ शकतो याबाबत माजी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.
शाळेतील शिक्षक अद्वैत जगधने व सौ. अश्विनी मारणे यांनी या निवासी मेळाव्याचे नियोजन केले होते. त्याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षक या वेळी उपस्थित होते. शाळेच्या प्राचार्य डॉ. सुलभा विधाते यांनी मेळाव्याचे औपचारिक उद्घाटन केले. याप्रसंगी शाळेचे कमांडंट ग्रुप कॅप्टन विजय कुलकर्णी हे देखील आवर्जून उपस्थित होते.