असीम त्याग, कष्ट आणि संघर्षाची कथा सांगणारे महानाट्य ‘वज्रमूठ’

 

आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि हाडाचे शिक्षक असलेले वामन प्रभाकर भावे व लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या रुपाने एकत्र आलेल्या शक्ती, बुद्धी आणि युक्तीच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना. ब्रिटिश सत्तेकडून देशाची आणि देशबांधवांची होणारी अवहेलना, होणारा अपमान याच्या विरोधात एकत्र येऊन शिक्षणाबरोबरच स्वावलंबन, इंग्रजी व लॅटिन भाषेबरोबर संस्कृत, भूगोलाबरोबर आपला दैदिप्यमान इतिहास, संस्कारांद्वारे संस्कृतीचा पुरस्कार करण्याच्या निश्चयाने स्थापन झालेल्या शिक्षण संस्थेचा इतिहास आज (रविवार, दि. २० नोव्हेंबर २०२२) सर्वांसमोर भव्य-दिव्य स्वरुपात सादर झाला, वज्रमूठ या महानाट्याद्वारे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या संस्थापकांना आदरांजली वाहण्यासाठी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सादर करण्यात आलेल्या या महानाट्याला शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला. संस्थेच्या विविध शाळा-महाविद्यालयातील सुमारे २५० विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी साकारलेले हे महानाट्य सर्वांच्याच काळजाचा ठाव घेणारे ठरले.

ब्रिटिश सत्तेचा रोष आणि उपद्रव, आर्थिक अडचणी, समाजाकडून हेटाळणी अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शाळा सुरू राहाव्यात म्हणून संस्थेच्या संस्थापकांनी केलेला असीम त्याग, कष्ट आणि संघर्ष यांची माहिती नव्या पिढीला या महानाट्यातून झाली. तसेच सुमारे दीडशे वर्षापूर्वीच्या काळातील घरांची रचना, माणसांचे पेहराव,  तेंव्हाच्या चालीरिती, सण साजरे करायच्या पद्धती या सर्व गोष्टी माहिती झाल्या.

संस्थेच्या नियामक मंडळाचे माजी सदस्य भालचंद्र पुरंदरे यांनी लिहिलेली या महानाट्याची संहिता मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचा माजी विद्यार्थी अभिषेक शाळू याने तितक्याच ताकदीने रंगमंचावर साकारली आहे. होनराज मावळे याचे संगीत, महेश लिमये आणि तेजस देवधर यांचे ध्वनी संयोजन व प्रकाश व्यवस्था अशा सर्वच अंगाने कसदार निर्मिती असलेल्या या महानाट्यातून इतिहासातील घटना प्रेक्षकांसमोर जीवंत झाल्या.

या महानाट्याच्या कार्यक्रमाला जागतिक किर्तीच्या नृत्यांगना व संस्थेच्या माजी विद्यार्थिनी मनिषाताई साठे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि प्रदीपजी नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदीताई पाटील व उपाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने परंपरा आणि नवता यांची चांगली सांगड घातली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या मूलभूत विषयांबरोबरच संस्थेने कालसुसंगत अशा विविध विषयांचे शिक्षण उपलब्ध करून दिले आहे याचा माजी विद्यार्थिनी म्हणून खूप अभिमान वाटतो. ‘मएसो’ने दिलेल्या शिकवणुकीतून प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मभान यावे अशी माझी इच्छा आहे,” अशा शद्बात मनिषाताई साठे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या प्रसंगी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वंशज, कै. वामन प्रभाकर भावे यांचे पणतू मंगेश भावे व लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांचे नातू दिलीप इंदापूरकर यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आनंदीताई पाटील यांनी या महानाट्याच्या निर्मितीमागील भूमिका आणि प्रक्रिया विषद केली.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची वाटचाल ही ध्येय, त्याग आणि बलिदानाची असून वारकऱ्यांच्या दिंडीप्रमाणेच संस्थेचे शिक्षक गेली १६२ वर्षे ‘मएसो’ची ज्ञानदिंडी वाहून नेत आहेत, असे सांगितले.

डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन तर इंजि. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.