भारताचे मा. राष्ट्रपती श्री. रामनाथजी कोविंद यांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा इतिहास ग्रंथ ‘ध्यास पंथे चालता … ‘ आज (गुरूवार, दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी) राष्ट्रपती भवनामध्ये सादर भेट देण्यात आला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीवजी सहस्रबुद्धे यांनी मा. राष्ट्रपतींचा याप्रसंगी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
मा. राष्ट्रपतींनी त्यांच्या पुणे भेटीत प्रकाशनानंतर हा ग्रंथ वाचण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आज ही भेट झाली. याप्रसंगी मा. राष्ट्रपतींनी ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले. हा ग्रंथ हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांत अनुवादित व्हावा जेणेकरून ‘मएसो’च्या वाटचालीची माहिती अखिल भारतीय स्तरावर पोहचेल आणि सर्वांना प्रेरणा मिळेल अशी सूचना केली. याप्रसंगी त्यांनी ग्रंथारंभीच्या पृष्ठावरील काव्यपंक्तीचा अर्थ समजून घेतला. ध्येयनिष्ठा व्यक्त करणाऱ्या या पंक्ती प्रेरणादायक आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील ‘मएसो’सारख्या संस्थांनी देशाला मार्ग दाखवला आहे, असे ते म्हणाले.
ग्रंथाच्या लेखिका डॉ. केतकी मोडक यांनी यावेळी मा. राष्ट्रपतींना ग्रंथाबद्दल माहिती दिली. संपूर्णपणे भारतीयांनी स्थापन केलेली आणि आजही वर्धिष्णू असलेली अशी संस्थेची वाटचाल ग्रंथातून उलगडली आहे, असे डॉ. मोडक यांनी सांगितले. संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेने वंचित घटकांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले आहेत. सुरवातीच्या काळात अनेक भाषांचे शिक्षण, आधुनिक शिक्षण ही संस्थेची वैशिष्ट्ये इतिहासात दिसून येतात असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले. संस्थेने १८९६ मध्ये सुरू केलेल्या महाराष्ट्र कॉलेजची गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी इंग्लंडच्या संसदेत दखल घेतली गेली. पण स्वातंत्र्याच्या मागणीसाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्रोही भाषणे केल्याने हे महाविद्यालय ब्रिटिशांच्या रोषाला पात्र झाले. त्यामुळे हे महाविद्यालय बंद पडले. महाराष्ट्र नावाची स्मृती ठेवण्यासाठी संस्थेचे नाव बदलून १९२२ मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी करण्यात आले.
स्वतःच्या पत्नीला सैनिकी शिक्षण देणारे संस्थापक वासुदेव बळवंत फडके यांचा महिला सक्षमीकरणाचा वारसा संस्थेच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या माध्यमातून पुढे चालवला जात असून शाळेच्या १५ विद्यार्थिनी सैन्यदलात अधिकारपदावर कर्तव्य बजावत आहेत, ही माहिती श्री. राजीवजी सहस्रबुद्धे यांनी मा. राष्ट्रपतींना दिली.
याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे उपस्थित होते.
संस्थापक वामन प्रभाकर भावे यांना ब्रिटिश सत्तेने नाकारलेले अनुदान मिळविण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. त्यांचा गौरव भारताचे प्रथम नागरिक असलेल्या मा. राष्ट्रपतींनी संस्थेच्या इतिहासाची दखल घेतल्याने झाला असे मत सुधीर गाडे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी मा. राष्ट्रपतींनी आपुलकीने सर्वांची विचारपूस केली. तसेच अगत्याने राष्ट्रपती भवन दाखवण्याची व्यवस्था केली.
संस्थेच्या वाटचालीची दखल मा. राष्ट्रपतींनी घेतल्याचा हा प्रसंग संस्थेच्या दृष्टीने ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. हा प्रसंग संस्थेच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.