‘मएसो’चा इतिहास ग्रंथ ‘ध्यास पंथे चालता …’ मा. उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते प्रकाशित

छायाचित्रात (डावीकडून) : ग्रंथाच्या लेखिका डॉ. केतकी मोडक, ‘मएसो’चे सचिव डॉ. भरत व्हनकटे, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ‘मएसो’चे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे.

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची १६० वर्षांची ऐतिहासिक वाटचाल मांडणाऱ्या ‘ध्यास पंथे चालता …’ या इतिहास ग्रंथाचे प्रकाशन करताना मला अतिशय आनंद होत आहे. हा ग्रंथ सिद्ध केल्याबद्दल मी संस्थेचे अभिनंदन करतो. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेपासूनची वाटचाल जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ संदर्भ म्हणून वाचकांना अतिशय उपयोगी ठरणार आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यासारख्या महान व्यक्तीने अन्य सहकाऱ्यांबरोबर १८६० मध्ये स्थापन केलेली पुण्यातील ही पहिली खासगी शिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या स्थापनेमागे युवावर्गाला वैज्ञानिक शिक्षण देऊन चारित्र्य निर्माणाबरोबरच त्यांच्यासमोर आदर्श ठेवण्याचे उदात्त ध्येय होते. जनतेमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न होता. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीप्रमाणेच परमहंस मंडळी, पुणे सार्वजनिक सभा, सत्यशोधक समाज अशा संस्थादेखील कार्यरत होत्या. अशा सर्व संस्थांमुळे राष्ट्रीयत्वाची भावना वाढीला लागली आणि देशातील स्वातंत्र्य सैनिकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना प्रबळ झाली. भारतीय पुनरुस्थानाच्या कालखंडात असे नेतृत्व आणि संस्था निर्माण करण्यात आणि स्वातंत्र्य संग्रामाची वैचारिक बैठक तयार करण्यात महाराष्ट्र अग्रेसर होता असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना महादेव गोविंद रानडे, वासुदेव बळवंत फडके यांच्यासारख्या देशभक्तांचा विसर पडून चालणार नाही,” असे प्रतिपादन देशाचे मा. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत बोलताना केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा आणि ‘ध्यास पंथे चालता…’ या संस्थेच्या इतिहास ग्रंथाचा प्रकाशन समारंभ देशाचे माननीय उपराष्ट्रपती श्री.  एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आज (मंगळवार, दि. ८ फेब्रुवारी २०२२ रोजी) राजधानी दिल्ली येथे उपराष्ट्रपती निवासात संपन्न झाला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे तसेच ग्रंथाच्या लेखिका डॉ. केतकी मोडक राजधानी दिल्लीत उपराष्ट्रपती निवासात उपस्थित होते.

ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे पुण्यातून सहभागी झाले होते. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी व्यासपीठावर उपस्थित होते. कोरोना निर्बंधांमुळे मर्यादित संख्येने निमंत्रित पुण्यातील मएसो ऑडिटोरीअममध्ये उपस्थित होते.

दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले.

ग्रंथाच्या लेखिका डॉ. केतकी मोडक यांनी संस्थेच्या इतिहास लेखनामागील प्रेरणा, भूमिका आणि लेखनासाठी केलेले संशोधन कार्य याबद्दल माहिती दिली.

संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.