विद्यादान
विद्यादानासाठी झटणारी तरुणाई
शिक्षण हा विकासाचा राजमार्ग आहे हे आपण सगळेजण जाणतोच, पण समाजातील फार मोठा वर्ग असा आहे ज्याला परिस्थितीमुळे शिकता येत नाही. समाजातील अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर करण्यासाठी आपल्या ‘पॉकेटमनी’तून केलेल्या बचतीचा विनियोग विद्यादानासाठी करणारी तरुणाई आज सर्वांसाठी खरोखरच आदर्शवत आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगांवचा अजय भोसले, पुण्यातील संस्कार मोरे, लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचा युवराज जाधव, लातूर जिल्ह्यातील उदगीरचा सचिन खडके, पुण्यातील अनामिका किलसे, तृप्ती बाटुंगे आणि भाग्यश्री बोराटे हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पहिल्या वर्षात शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी, कॉलेजमध्ये दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या ‘निनाद’ या भित्तीपत्रकाच्या निमित्ताने एकत्र आले आणि ‘आपणही समाजाचे काही देणे लागतो’ या सामाजिक जाणीवेने एकमेकांशी चांगलेच जोडले गेले. ही जाणीव केवळ विचारांपुरती आणि गप्पांपुरती मर्यादित न ठेवता या ‘निनाद ग्रुप’ने ती प्रत्यक्षात उतरवली. समाजातील होतकरू आणि गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने सुरू केलेल्या ‘विद्यादान निधी’मध्ये योगदान देऊन त्यांनी एक आदर्शच निर्माण केला आहे.
दौंड तालुक्यातील पारगांवमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील बहुतेक विद्यार्थी हे ऊसतोड कामगारांची मुले आहेत. वर्षानुवर्षे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या या गटातील विद्यार्थ्यांना आता शिक्षणाची दारे खुली झाली असली तरी त्यांना पुरेसे शैक्षणिक साहित्य आणि खेळाचे साहित्य मिळत नाही हे लक्षात घेऊन ‘निनाद’ ग्रुपने गेल्या दिवाळीच्या सुटीत शाळेल हे साहित्य भेट दिले. गावांमध्ये जाणवणाऱ्या प्रदुषणावर मात करण्यासाठी पारगांव, देलवडी, नांदगाव आणि निमोणे या चार गावांमध्ये सावली देणारी तीस झाडे शाळांबरोबरच रुग्णालयाच्या परिसरातही त्यांनी लावली आहेत. जागरूकपणे ती सर्व झाडे आजही जिवंत आहेत याची खातरजमाही केली आहे. दिवाळीचा आनंद लुटत असताना या ध्येयवेड्यांना समाजातील वंचितांचा विसर पडला नाही. दौंड शहरातून जुने पण चांगल्या स्थितीतील कपडे त्यांनी जमा केले. ते व्यवस्थित धुवून आणि इस्त्री करून तब्बल ४५० ड्रेस त्यांनी ऊसतोड कामगारांना दिले. हे सगळं का केलंत?, एवढ्यावरच थांबणार का? या प्रश्नांना या तरुण-तरुणींनी दिलेली उत्तरे देशाच्या भविष्याकाळाबद्दल आश्वासकता निर्माण करणारी आहेत. तरुणवर्गात सामाजिक जबाबदारीचे भान येणे महत्त्वाचे आहे असे सांगताना तृप्ती म्हणाली, “सगळेच प्रश्न पैशाने सुटत नाहीत त्यासाठी जाणीव निर्माण करण्याची आवश्यकता असते, महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणाच्या बाबतीत याची खरी गरज आहे.”
“अमलीपदार्थांच्या विरोधात कॉलेजमध्ये जागृती करायची आहे. परस्परांबद्दल आदराची भावना जपली पाहिजे, दिखावूपणाला बळी पडून पैशांची उधळपट्टी न करता त्याचा योग्य तो विनियोग केला पाहिजे.” हे विचार त्यांच्यावर झालेल्या संस्कारांची साक्षच देत होते.
“आपला भारत देश गेली अनेक वर्षे विकसनशील आहे पण तो विकसित कधी होणार?” हे अनामिकाचे उद्गार कोणालाही अंतर्मुख करणारे आहेत.
विभिन्न कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या या तरूणांनी एकत्र येऊन समाजाचे हित साधण्यासाठी आपला मार्ग निवडला आहे, आता विकासाची आस असलेल्या होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी आपण काय करणार हा प्रश्न महत्वाचा आहे!
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ‘निनाद ग्रुप’ने संस्थेच्या विद्यादान निधीमध्ये दिलेले योगदान स्वीकारताना संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे. यावेळी नियामक मंडळाच्या सदस्य डॉ. केतकी मोडक आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर हेदेखील उपस्थित होते.