‘चीनबाबत देशात जागरुकता निर्माण करण्याची गरज’
“चीनमध्ये काय घडते आहे आणि चीनसंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्या घडामोडी होत आहेत याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आगामी २५ वर्षे चीनची अर्थव्यवस्था ही जगाच्या विकासाच्या केंद्रस्थानी राहील. समस्यांवर मात करण्याची चीनची क्षमता फार मोठी आहे. देशातील नागरिकांच्या जीवनाचा दर्जा आणि जीवनमूल्य सुधारण्यावर त्या देशाने आता लक्ष केंद्रीत केले आहे. एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या ३ टक्के रक्कम चीन शिक्षणावर खर्च करत आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिकेवर मात करणे हे चीनचे ध्येय आहे. या सर्व परिस्थितीत चीन भारताकडे कोणत्या नजरेने बघते हे महत्वाचे आहे. त्यामुळे आपल्या देशात चीनबाबत जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे”, असे प्रतिपादन माजी परराष्ट्र सचिव श्री. विजय गोखले यांनी आज येथे केले.
‘२१ व्या शतकातील भारत-चीन संबंध: आव्हाने आणि संधी’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज (CASS) चे संचालक आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (MES) चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), सेंटर फॉर चायना अॅनॅलिसिस अँड स्ट्रॅटेजी (CCAS) चे अध्यक्ष श्री. जयदेव रानडे, मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त) आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे व्यासपीठावर उपस्थित होते.
“भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निर्णयक्षमता, भारताचे व्यूहात्मक धोरण, भारताचा वाढता प्रभाव, अलिप्ततावादापासून राखलेले अंतर आणि धोरणात्मक दृष्टीकोनातून देशातील लोकशाही व्यवस्थेचा भारत करत असलेला उपयोग या बाबी चीनसाठी अडचणीच्या असून भारताला अमेरिकेकडे झुकण्यापासून रोखण्यासाठी चीन द्विपक्षीय संबंधातील तणाव काही प्रमाणात कमी करेल. मात्र त्यामध्ये चीनला अपयश आले तर लष्करी तणाव परत एकदा वाढवला जाईल. या सर्व परिस्थितीत भारताने अमेरिका आणि चीन यांच्यात असलेल्या व्यापार युद्धाचा फायदा उठवण्याची गरज आहे. ‘मेक इन इंडिया’चे धोरण यशस्वी होणे आवश्यक आहे. ५ जी तंत्रज्ञानाबाबत संशोधन आणि विकासासाठी संबंधित देशांशी सहकार्य करायला हवे. शस्त्रास्त्रांच्या निर्मितीत प्रगती करण्याची आवश्यकता आहे. रशिया हा आपल्याला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारा विश्वासू सहकारी आहे, त्याच्याबरोबरचे संबंध अधिक बळकट करण्याची गरज आहे. चीन घेत असलेल्या आक्षेपांना भारताने फार किंमत देण्याची आवश्यकता नाही, ” असे गोखले यांनी या वेळी सांगितले.
सेंटर फॉर चायना अॅनॅलिसिस अँड स्ट्रॅटेजी (CCAS) चे अध्यक्ष श्री. जयदेव रानडे आपल्या भाषणात म्हणाले की, “चीनमधील घटना आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम याचा प्रामुख्याने विचार करण्याची गरज आहे. डोकलाममधील घडामोडींनंतर भारत-चीन संबंध एका महत्वाच्या वळणावर पोहोचले आहेत. कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम झाला आहे. त्यांच्या विकासाचा दर एक टक्क्याने घसरला आहे. चीनमधील सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. चीनमध्ये त्यामुळे प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून भारताच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब आहे. कोरोनाचा परिणाम जानेवारी महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येईल असा दावा चीनच्या सरकारने केला होता. मार्च महिना उजाडला तरी तसे काहीच घडले नाही.”
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करून आपल्या भाषणात या परिसंवादाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
अपूर्वा बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.
दिवसभर चालेल्या या परिसंवादाच्या पहिल्या सत्रात भारत-चीन आर्थिक संबंध याविषयावर अर्थतज्ञ श्री. अजित रानडे आणि श्रीमती नम्रता हसीजा यांचे व्याख्यान झाले.
दुसऱ्या सत्रामध्ये लेफ्टनंट जनरल प्रवीण बक्षी (निवृत्त) आणि कमांडर अर्नब दास (निवृत्त) यांनी ‘डोकलाम विवाद ते मामल्लापूरम अनौपचारिक शिखर परिषद: भारत – चीन यांच्यातील लष्करी संबंधांमधील स्पष्ट कलांचे विश्लेषण’ केले.
तिसरे सत्र ‘हाँगकाँगमध्ये अलिकडेच्या काळात झालेली निदर्शने आणि त्याचा चीनच्या सिकियांग प्रांतातील उईगर मुस्लिम समाजावर तसेच तिबेट व तैवानमधील दलाई लामांच्या समर्थकांवर होणारा परिणाम’ या विषयावर झाले. त्यामध्ये भारतीय परराष्ट्र सेवेतील निवृत्त अधिकारी गौतम बंबावले आणि डॉ. प्रियांका पंडित यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली.
भारताचे माजी परराष्ट्र सचिव श्री. सुधीर देवरे यांच्या भाषणाने परिसंवादाचा समारोप झाला.