दिनांक : ७ जून २०२१, सोमवार
समय: सकाळी ११:०० वा.
वैशाख कृ. १२, शके १९४३
स्थळ: मएसो भावे प्राथमिक शाळा सभागृह, सदाशिव पेठ, पुणे -४११०३०
आज दि. ७ जून २०२१ या दिवशी मएसो भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहाला एकप्रकारे मुक्त वायुविजनाचा योग आला असावा. गेले अनेक महिने केवळ शासनाच्या विद्यार्थी मासिक पोषक आहार योजनेच्या अंतर्गत वितरीत केला जाणारा शिधा घेण्यासाठी काही पालक येत असावेत नाही तर फारसे काही कार्यक्रम होत नसावेत, आज मात्र खूपच चैतन्य आले होते.
विद्यार्थ्यांना घडविणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, त्यांची काळजी घेणारे सेवक, सेविका व सुरक्षा कर्मचारी यांच्यासाठी सामाजिक जाणीवेने आपल्या निधी संकलनातून काहीना काही करावे हा विचार आपल्या पहिल्या पुष्पानंतर मनात रूजत होताच. त्याचीच परिणिती आज होत होती.
गेले दोन दिवस पावसाळी हवामानाने पावसाचे सावट होतेच. सकाळच्या ढगाळ वातावरणाने मन किंचित साशंक होते. त्यामुळे ७ जूनला ऐन वेळेस बरसण्याऐवजी पर्जन्यराजाने कृपा करून त्याच्या आगमनाची वर्दी कार्यक्रमानंतर द्यावी अशी मनोमन प्रार्थना केली.
संयोजन समूह व शाळेचे मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी यांनी सभागृह सुंदररित्या सुसज्ज केले होते. तसेच मुख्याध्यापकांनी माजी विद्यार्थ्यांचे प्रसन्न वदनाने स्वागत करून चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
वरील संकल्पानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास मएसोच्या भावे प्राथमिक शाळेचे मा. मुख्याध्यापक श्री. अनिल खिलारे सर व बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रस्ता या शाळेचे मा. मुख्याध्यापक श्री. बडधे सर व आपले वर्गमित्र उपस्थित होते. याचबरोबर मएसोच्या विविध शाळांमधील हंगामी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सेवक, सुरक्षा कर्मचारी वर्ग हे लाभार्थींच्या रुपाने उत्साहाने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्गमित्र किरण कृष्णाजी जोशी याच्याकडे सोपविले होते. प्रास्ताविक भाषणात त्याने या संकल्पाची संक्षिप्त माहिती दिल्यानंतर माननीय मुख्याध्यापक सर्वश्री खिलारे सर व बडधे सर यांनी त्यांचे मनोगत सुंदररित्या व्यक्त केलेच पण त्याबरोबर आपल्या १९७० च्या चवथीच्या तसेच १९७६ च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवेतून हाती घेतलेल्या या संकल्पांचे सार्थ अभिमानाने मनापासून कौतुक केले. त्यांच्या प्रत्येक शब्दातून शिक्षक वर्गाला आपल्याबद्दल वाटणाऱ्या स्नेहाचा व जिव्हाळ्याचा परिचय नक्कीच होत होता. श्री. खिलारे सरांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांचा परिचय करून दिला.
पहिल्या पुष्पात आपण माजी विद्यार्थी वर्गमित्रांनी वाहन चालकांसाठी जो कार्यक्रम केला होता त्यातून मएसो बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रस्ता या शाळेतील शिक्षकवर्गास प्रोत्साहन मिळाल्याचा आणि त्यानंतर रिक्षाचालकांसाठी असाच शिधावाटपाचा कार्यक्रम आयोजित केल्याचा आवर्जून उल्लेख श्री. बडधे सरांनी केला.
त्या नंतर आपल्या या संकल्पाचे हितचिंतक श्री. किरण इंगळे, अध्यक्ष , रोटरी क्लब ॲाफ पुणे, सहवास प्रभाग यांनी त्यांचे मनोगत संक्षिप्त स्वरूपात व्यक्त केले. त्यात त्यांनी संस्था व संस्थेच्या अंतर्भूत शाळांना नियोजित उपक्रम राबविण्यास सहाय्य करण्याचा मानस व्यक्त केला. श्री. इंगळे यांनी आपण सर्वांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केलेच व त्यांना माजी विद्यार्थीरूपाने या समूहात सामावून घ्यावे अशी मनोमन इच्छा व्यक्त केली. रोटरी क्लब ॲाफ पुणे, सहवास प्रभागतर्फे सर्वांना मुखपट्टी देण्यात आली.
भावे प्राथमिक शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. ताठे यांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर कार्यक्रम पुढच्या टप्प्यात पोहोचला, ज्यात लाभार्थ्यांना मान्यवर व उपस्थित वर्गमित्रांच्या हस्ते शिधा सुपूर्तिचा कार्यक्रम प्रसन्न वातावरणात संपन्न झाला.
सकाळी कार्यक्रमाच्या आधी ग्राहक पेठ डिपार्टमेण्टल स्टोअर्सने सर्व शिधा संच वेळेत सभागृहात पोहोचते केले व याचे संयोजन आणि सर्वेक्षण विवेक वामन जोशी याने त्याच्या सध्याच्या कोविड सेवेच्या कार्यातून सवड काढून सर्वांआधी पोहोचून उत्तमरित्या केले.
वर्गमित्र हेमंत शशीशेखर गोडबोले याने इतर मित्रांच्या साथीत लाभार्थ्यांना क्रमवारीने पाचारण करून कार्यक्रमाच्या सुसूत्रतेत भर घातली.
सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी आपले वर्गमित्र राजेंद्र प्रभुदास गुजराथी , प्रदीप शेलार, सुनिल अंबवणेकर, हेमंत पुराणिक व सतिश फाटक यांनी सुंदर ताळमेळ व संयम ठेवून अविरतपणे बसून लाभार्थ्यांचे वैद्यकीय परिमाण मापन करून नावांच्या सूची प्रमाणे सहृदयतेने शहानिशा करून त्यांना सभागृहात प्रवेश देण्याचे काम चोख बजावले. त्याशिवाय या शिधा वाटपाच्या कार्यक्रमात संयोजनात उत्साहाने सहभाग पण घेतला व शिधा संच मान्यवरांच्या हस्ते देण्यात शारीरिक मदत केली. याचे खरोखरच कौतुक करावे तेवढे कमी आहे. वय ही केवळ एक संख्या आहे हे आज सिद्ध झाले.
कार्यक्रम सिद्धीस नेण्यात सर्व वर्गमित्रांच्या योगदानाची व त्यांच्या शुभेच्छांची खूप मौलिक कामगिरी होऊन सगळ्यांच्याच मनात समाधान खचितच झाले असावे या आशेने आजच्या ‘सामाजिक ऋण व शिधा सुपूर्ती संकल्प : पुष्प २’ चा वृत्तांत येथेच पूर्ण करतो.
संयोजनात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या वर्गमित्रांच्या उत्साहाला आपला सलाम व बाकी वर्गमित्रांच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद!
आपले शुभचिंतक,
मएसोच्या पेरूगेट भावे स्कूलचे सन १९७६चे इयत्ता १०वी चे माजी विद्यार्थी.
शब्दांकन : कॅप्टन किरण कृष्णाजी जोशी