“वादनासाठी एकत्र न येता, एकत्र येण्यासाठी वादन”
रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या ढोल पथक सदस्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले. खऱ्या अर्थाने एकमेकांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी आसुसलेल्या या पथक परिवारातील सदस्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीतही सोशल डिस्टंसिंग पाळून उत्कृष्ट नियोजन केले व 89 रक्तदात्यांनी रक्तदानाच्या या महायज्ञा मध्ये आपले समर्पण केले. गर्दी टाळण्यासाठी वेगवेगळ्या बॅचेस नुसार रक्तदात्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध असा हा कार्यक्रम पार पडला.
रक्तदान शिबिराच्या संकल्पाला मूर्त स्वरूप देण्याचे अत्यंत महत्त्वाचे नियोजनबद्ध काम ‘आचार्य आनंदऋषीजी रक्तपेढी’ने केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व गट-प्रमुखांनी अथक प्रयत्न केले. काही कारणामुळे ज्यांना यात इच्छा असूनही सहभागी होता आले नाही त्यांनी पुढील वर्षी नक्की येण्याचा संकल्प केला.
प्रशालेचे महामात्र व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव मा. श्री. सुधीरजी गाडे यांनी स्वतः रक्तदान करून आयोजकांचे व इतर रक्तदात्यांचे मनोबल वाढवले, तर शाला समिती अध्यक्षा श्रीमती आनंदीताई पाटील व मुख्याध्यापक श्री. अविनाश वाघमारे यांच्या सहकार्यामुळे, उपक्रम प्रमुख श्री. अजिंक्य देशपांडे यांच्या प्रयत्नामुळे आणि अशा उपक्रमांमध्ये कायम स्वतःला झोकून देणारे पथकातील सदस्य श्री. मंदार देशपांडे व सर्व वादक, स्वयंसेवक, माजी विद्यार्थी यांच्या उत्तम नियोजनामुळे कार्यक्रम अतिशय हृद्य व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सौ. विमलाबाई गरवारे ढोलपथक हे आपल्या सांस्कृतिक पुण्यातील अत्यंत जुनं आणि नावाजलेलं पथक. पुण्यातील अनेक महत्त्वाच्या आणि मानाच्या गणपतींसमोर वादन करणाऱ्या या पथकाचे 2020 हे 44 वे वर्ष. दरवर्षी फक्त वादनाचा सराव किंवा मिरवणुकीत वादन एवढ्यापुरता हा उपक्रम मर्यादित नसून नेहमीच सामाजिक भान जपणारे व वादकांना अंतर्मुख करणारे कार्यक्रम या पथकामार्फत राबवले जातात. तसेच सामाजिक क्षेत्रात चांगल्या स्वरूपाचे काम करणाऱ्या संस्थेला सर्व वादक दरवर्षी वर्गणी काढून मोठी रक्कमही समर्पित करतात.
या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती उत्सव साधेपणाने साजरा करायचा हे निश्चित झाल्यावरही दरवर्षी प्रमाणे एकमेकांना भेटावयास आसुसलेले व नवनवीन उपक्रम राबविणयासाठी उत्सुक असलेले माजी विद्यार्थी, वादक यांनी या वर्षीच्या कार्यक्रमांची रूपरेषा ठरवली. त्यात बरेचसे कार्यक्रम ऑनलाईन मीटिंग च्या स्वरूपातले आहेत जसे की पथकातीलच ज्या वादकांनी कोविड योद्धा म्हणून भूमिका बजावली आहे व ज्यांना कोरोना झाला होता अशांचे अनुभव, कोरोना काळात मृत्यू पावलेल्या शेकडो कोरोना पेशंट्सवर अंत्यसंस्कार करणारे श्री अरुण जंगम यांची मुलाखत, Insurance चे प्रकार व त्यांचे महत्त्व यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम ठरवले आहेत व ते संपन्न होत आहेत.
प्रशालेच्या या पथकातील सदस्यांनी ‘वादनासाठी एकत्र न येता, एकत्र येण्यासाठी वादन’ हे शाळेच्या ढोलपथकाचे व गणेशोत्सव उपक्रमाचे ब्रीदवाक्य सर्वांनी खऱ्या अर्थाने सार्थ केले.
0
People Reached
0
Engagements
Boost Post
Like
Comment
Share