महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांमध्ये यावर्षी ‘सामाजिक भोंडला’ हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला. मुलगा-मुलगी कोणताही भेदभाव न करता सर्वांनी एकत्रितपणे या भोंडल्यात सहभागी व्हावे आणि
शाळेशी संबंधित सर्व घटकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचे महत्व समजावे म्हणून भोंडल्यासाठी पर्यावरणपूरक वस्तूंचाच वापर करण्यात आला. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून भोंडल्यासाठी हत्तीची प्रतिमा तयार केली. भोंडल्याच्या सुरवातील सर्वांना भोंडल्याची परंपरा व इतिहास सांगण्यात आला. त्यांनतर हत्तीच्या प्रतिमेभोवती फेर धरून सर्वांनी भोंडल्याची अनेक गाणी गायली. भोंडल्यासाठी निवडलेली ही गाणी विविध सामाजिक संदेश देणारी होती. सर्वांनी भोंडल्याचा मनसोक्त आनंद लुटून खिरापतीचा आस्वाद घेतला. भोंडल्याच्या कार्यक्रमामुळे शाळांची मैदाने फुलून गेली होती. शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींबरोबरच शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांनी या सामाजिक भोंडल्याच्या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पुणे, बारामती, सासवड, शिरवळ, नगर, नवी मुंबई, पनवेल या ठिकाणी असलेल्या सर्वच शाळांमध्ये हा उपक्रम अतिशय आनंदात व जल्लोषात साजरा करण्यात आला.
म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक भोंडल्यामध्ये प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आणि विद्यमान नगरसेविका मा. माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांनी ‘एक झाड लावू बाई, दोन झाड लावू’ हे पर्यावरण पूरक गीत मोठ्या आनंदाने गायिले. प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी व नेत्रतज्ञ डॉ. गीतांजली शर्मा या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या महाभोंडल्यात सहभागी होता आले याबद्दल प्रशालेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
म. ए. सो. बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रोड या शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक भोंडल्यात माजी विद्यार्थ्यांबरोबरच सहभागी झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी देखील भोंडल्यात प्रत्यक्ष फेर धरला आणि आनंद घेतला. सामाजिक कार्य करणारे आणि शाळेला सहकार्य करणारे कर्मचारी, अधिकारी, कार्यकर्ते, यांचा यावेळी सन्मानचिन्ह व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
म. ए. सो. रेणुका स्वरुप प्रशालेमध्ये माजी विद्यार्थिनींच्या हस्ते भोंडल्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गजराजाच्या प्रतिमेभोवती फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणत सर्वांनी भोंडला साजरा केला. सामाजिक जाणीवांचाही जागर व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रशालेतून १९८१ साली इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या तुकडीपासून नुकत्याच बाहेर पडलेल्या विद्यार्थिनी देखील आवर्जून सहभागी झाल्या होत्या. शाळेच्या आजी-माजी शिक्षिका, कर्मचारी देखील या भोंडल्यात सहभागी झाल्या होत्या.
म. ए. सो. मुलांचे विद्यालयातील सामाजिक भोंडल्याला २५० विद्यार्थी, माजी विद्यार्थी-शिक्षक, पालक आवर्जून उपस्थित होते.
म. ए. सो. पूर्व-प्राथमिक शाळा, सदाशिव पेठ या शाळेत माजी शिक्षक व माजी विद्यार्थी यांचा भोंडला आयोजित करण्यात आला होता. माजी विद्यार्थ्यांना त्यांचे बालपण परत अनुभवता यावे म्हणून शाळा विविध फुलांनी सजवण्यात आली होती. सर्वांनी गप्पा – गोष्टींमधून पूर्वस्मृतींना उजाळा दिला.