‘मएसो’चे उपाध्यक्ष व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. यशवंत वाघमारे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांची श्रद्धांजली
पुणे, दि. ३१ : हाडाचे शिक्षक असलेल्या, शिक्षण आणि विद्यार्थ्यांबद्दल प्रचंड आत्मीयता असलेल्या, आपल्या मार्गदर्शनाने अनेकांना यशाचा मार्ग दाखवणाऱ्या एका ज्ञान तपस्व्याला आपण मुकलो आहोत अशी भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज (मंगळवार, दि. ३१ जानेवारी २०२३) डॉ. यशवंत वाघमारे यांना श्रद्धांजली वाहताना व्यक्त केली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. यशवंत वाघमारे यांचे शुक्रवार, दि. २७ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज मएसो इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंड अँड करियर कोर्सेस (आयएमसीसी) मध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत), उपाध्यक्ष प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, डॉ. वाघमारे यांची पत्नी श्रीमती अंजली व कन्या श्रीमती ऋता वाघमारे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. वाघमारे यांचे कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी तसेच शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, मएसोचे आजी-माजी पदाधिकारी या सभेला उपस्थित होते.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत) या प्रसंगी म्हणाले की, डॉ. वाघमारे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या परिवारातील एक महत्वाचा दुवा निखळला आहे. प्रत्येकाला प्रोत्साहित करणारे, बहुआयामी, मनमिळावू असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. डॉ. वाघमारे यांनी असंख्य विद्यार्थी घडवले. त्यामुळेच संस्थेच्या महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विज्ञान-तंत्रज्ञान विषयक विविध परिषदांसाठी अनेक तज्ञांना निमंत्रित करता आले. क्वांटम फिजिक्स सारख्या विषयातील तत्वज्ञान ते सांगत असत. त्यांच्या व्यक्तिमत्वात सकारात्मकता होती आणि जीवनाच्या सर्वच क्षेत्रात त्यांना रुची होती.
श्रीमती ऋता वाघमारे आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाल्या की, ते अतिशय सहृदयी आणि सहनशील होते. त्यांच्याबरोबर फिरायला जाणे, खरेदी करणे, बॅडमिंटन-पत्ते खेळणे, बाहेर खाणे हे सर्व काही आनंददायी असे. शिक्षण, ज्ञान हा त्यांचा ध्यास होता त्यांनी कोणतीच गोष्ट आर्थिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून केली नाही. ते कायमच सकारात्मक होते. अंधाराला दोष न देता प्रकाश निर्माण केला पाहिजे अशी त्यांची शिकवण होती.
श्रीमती ऋता वाघमारे यांनी आपली कन्या उमा हिने आजोबांना वाहिलेली श्रद्धांजली यावेळी वाचून दाखवली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष रवींद्र वंजारवाडकर याप्रसंगी बोलताना म्हणाले की, ‘मएसो’च्या निमित्ताने १२-१३ वर्षांच्या सहप्रवासात डॉ. वाघमारे संस्थेच्या वाटचालीबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त करत आणि त्याचे श्रेय ते आम्हा सहकार्यांना देत असत. ते कायमच मुक्त कंठाने स्तुती करत. संस्थेच्या विविध शाखांमध्ये जात असत आणि तिथल्या शिक्षक व विद्यार्थ्यांशी त्यांचे आत्मीयतेचे संबंध असत. ते उच्चविद्याविभूषित होते, आय.आय.टी. कानपूर सारख्या प्रतिष्ठित, थोर शिक्षक व शास्त्रज्ञ घडवणाऱ्या संस्थेत काम करूनही त्यांच्यात साधेपणा होता, जगातील नामवंत व महत्वाच्या शिक्षण संस्थांमध्ये शिकवणारे डॉ. वाघमारे नेहमीच प्रेमाने व आत्मीयतेने वागत असत. अतिशय क्लिष्ट विषय साधेपणा शिकवणारे ते ज्ञानयोगी होते. आपल्यावरील प्रत्येक जबाबदारी त्यांनी तन-मन-धनपूर्वक पार पाडली त्यामुळे ते कर्मयोगी होते. अमेरिकेतील कॅलिफोर्नियासारख्या ख्यातनाम विद्यापीठात काम करण्याची सुवर्णसंधी असताना त्यांनी देशात परत येऊन अनेक उच्चविद्याविभूषित विद्यार्थी घडवले, त्यातून त्यांची देशाबद्दलची भक्ती दिसून येते, त्यामुळे ते भक्तीयोगी होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात हा एक त्रिवेणी संगमच होता. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणे हीच डॉ. वाघमारे यांना श्रद्धांजली ठरेल.
आय.आय.टी. कानपूरचे माजी डायरेक्टर डॉ. संजय धांडे यांनी डॉ. वाघमारे यांना आय.आय.टी. कानपूरच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की, नोबेल पारितोषिकप्राप्त शास्त्रज्ञ दिवंगत मारिया जी. मायर यांच्या समवेत असिस्टंट रिसर्च फिजिसिस्ट म्हणून १९६३ ते १९६५ या काळात अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात डॉ. वाघमारे यांनी काम केले. त्यानंतर १९६६ मध्ये ते आय.आय.टी. कानपूरमध्ये रुजू झाले. डॉ. वाघमारे विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. एम.एस्सी. आणि पीएच.डी. प्रमाणेच ‘जेईई’च्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. उत्तम शिक्षक म्हणून ख्यातनाम असलेले प्रो. हरिश्चंद्र वर्मा हे त्यांचेच विद्यार्थी. आय.आय.टी. कानपूरमध्ये प्रा. रमेश सिंगरू आणि प्रा. गिरीजेश मेहता हे डॉ. वाघमारे यांचे अतिशय निकटचे साहाय्यक सहकारी होते. डॉ. वाघमारे सगळ्यांबरोबर मिळूनमिसळून रहात आणि अनेकांना वेळोवेळी मदत करत. आपल्या घरी आलेल्या व्यक्तींचे ते अतिशय आपुलकीने आणि आनंदाने आदरातिथ्य करत असत. आपल्या सहकाऱ्यांशी त्यांचे वर्तन मित्रत्वाचे असायचे. विशेष म्हणजे डॉ. वाघमारे क्रिकेट अतिशय उत्तम खेळायचे.
हाडाच्या शिक्षकाला जरी आपण पारखे झालो असलो तरी त्यांची शिकवण त्यांनी मागे ठेवली आहे, त्यांच्यासारख्या ज्ञान तपस्व्याला जरी आपण मुकलो असलो तरी त्यांचे तप सर्वांसाठी प्रेरणा देणारे आहे, अशा शद्बात ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे माजी उपाध्यक्ष संजय इनामदार यांनी डॉ. वाघमारे यांना आदरांजली वाहिली.
डॉ. यशवंत वाघमारे यांचे बंधू प्रकाश वाघमारे व मेहुणे कुमार भोगले, मएसो चे सचिव डॉ. भरत व्हनकटे, मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक व इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टिचर्सचे जे. पी. गद्रे, मएसो चे माजी सचिव प्रा. र.वि. कुलकर्णी, सुनीलराव खेडकर, डॉ. गोविंद कुलकर्णी आदींनी डॉ. वाघमारे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
इंजि. सुधीर गाडे यांनी सूत्रसंचालन केले.