म.ए.सो. विमलाबाई गरवारे प्रशालेचे माजी विद्यार्थी व यशस्वी उद्योजक श्री. विश्वास काळे यांनी शाळेविषयी लिहिलेला लेख…!
आपण सर्वांनी नक्की वाचवा…!
माझी शाळा
पूर्वी जी ‘भावे शाळा’ या नावाने ओळखली जायची ती आताची विमलाबाई गरवारे हायस्कूल, ही माझी शाळा. माझे काका, भाऊ यांच्यानंतर मी त्या परंपरेनुसार प्रथम बाल शिक्षण मंदिर आणि मग या शाळेत पाचवीत प्रवेश घेतला. त्याचवर्षी प्रथमच मुले मुली अ या तुकडीत एकत्र ठेवायला सुरुवात झाली. त्यामुळे आमची मानसिक प्रगल्भता नैसर्गिकरित्या वाढीस लागली, शारीरिक वयाबरोबर. त्यामुळे आजही आम्ही अनेकदा मुले मुली एकत्र भेटतो, छान गप्पागोष्टी होतात. हे शाळेने आम्हाला दिलेले मोठे योगदान आहे. शाळेत अनेक चांगले शिक्षक-शिक्षिका होते, त्यांनी प्रत्येकात रस घेऊन शिकवले असे सगळ्यांना वाटे. वर्गात एकूण विद्यार्थी-संख्याही सुमारे चाळीस असायची. सोवनी, भिडे, भिलवडीकर, पाटसकर, आपटे, साने, देवस्थळी, देशमुखबाई, लागूबाई, पी वाय जोशी, किती नावे घ्यावीत.
पुढे शाळेशी परत संबंध आला माझ्या अमृता आणि अनुभव या मुलांमुळे. त्यावेळी इतर मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असली तरी आम्ही त्यांना याच मराठी माध्यमाच्या शाळेत घातले. दोघेही दहावीत बोर्डात आले आणि नंतर शाळेत पुन्हा काही वर्षाने गेलो तेव्हा नामफलकावर त्यांची नावे पाहून बरे वाटले.
मराठी माध्यमामुळे आणि इतर कारणांनी शाळेत येणार्या मुलांचा स्तर वेगळा होऊ लागला होता. शाळेत गेल्या वर्षी जायचा योग आला. शाळेत सुमारे पस्तीस वर्षाने पाऊल ठेवत होतो. जिन्याने वर गेलो. जाताना पूर्वीच्या आठवणी होत्या, हा वर्ग इथे होता, ग्रंथालय इथे होते, पाणी प्यायची सोय इथे होती, असे बरेच आठवत होते. तास संपल्याची घंटा मात्र जागेवरच होती. पूर्वीसारखाच मधल्या सुट्टीचा दंगा चालू होता. मला जिथे जायचे त्या वर्गात शिरल्यावर अतिशय उत्साहजनक वातावरण दिसले. तिथे शाळेला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने ‘प्रयोगातून विज्ञान’ हा प्रकल्प चालू होता. शाळा चैतन्याने भरलेली दिसली. मी त्या उपक्रमासाठीच गेलो होतो.
त्याला थोडा इतिहास आहे.
मी आठवीत गेलो आणि जोशीसर आम्हाला शास्त्र शिकवण्यासाठी आले. त्यांचे शाळेतले शिक्षक म्हणून पहिलेच वर्ष होते. पहिला तास सुरू झाला आणि जाणवले की हे जरा वेगळ्या रितीने शिकवणारे आहेत. मला लहानपणापासून विज्ञान विषयाची खूप आवड, त्यामुळे दुरुस्त्या, मोडतोड करून शिकणे हे उद्योग मी करत होतो. जोशीसर हे प्रयोगातून आणि सर्व शंकांना उत्तरे देऊन, त्यांचे नीट निराकरण करून शिकवत. ते मला फारच आवडले. काही शिक्षक ते सांगतील ते बरोबर, शंका विचारायची नाही असेही असत. जोशीसर एखाद्या प्रश्नाचे उत्तर लगेच देता आले नाही तर मनमोकळेपणाने सांगायचे की याचे स्पष्टीकरण मी नीट विचार करून सांगतो. आणि सांगायचेही. हा मोकळा निकोप दृष्टिकोन विशेष होता. प्रश्न विचारा आणि उत्तरे मिळवा. विज्ञानामध्ये प्रगती होण्यासाठी हा महत्वाचा विचार त्यांनी आम्हाला दिला. आठवी आणि नववीमध्ये त्यांनी घातलेली ही रुजुवात मार्गदर्शक ठरली. या उर्जेमुळे पुढे आम्ही काही पालक, आमची मुले शाळेत असताना, एकत्र येऊन मुलांसाठी एक विज्ञान उपक्रम सुरू केला. आणखी पुढे वयाने मोठे झाल्यावर अनेक उपक्रम सुरू केले, सहभागी झालो, आणि चालूहि आहेत.
आज शाळेत ‘प्रयोगातून विज्ञान’उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी प्रथम बुजत होते, मग मात्र प्रश्न विचारू लागले, शिक्षकांचाही उत्साह वाढला. प्रकल्पासाठी आर्थिक पाठबळ नसताना,वेळ देऊन ते हा उपक्रम आनंदाने करत होते. हे विद्यार्थी इतर शाळातील कदाचित चांगली संधि मिळालेल्या मुलांपेक्षा अधिक सतेज वाटले, फक्त ह्या संधीचीच ते जणू काही वाट बघत होते.मग मीही उत्साहाने त्यात सहभागी झालो. ह्या उपक्रमाला पूर्ण सहाय्य करणारे मुख्याध्यापक अविनाश वाघमारे,मेघना देशपांडे आणि स्वप्नाली जगदाळे ह्यांचे कौतुक करावे ते कमीच ठरेल. ही शाळेतील मंडळी झपाटलेली आहेत.
आणखी विशेष म्हणजे रविंद्र गोडबोले ह्या आय टी इंजीनियरने नोकरी सोडून अशा इथे आणि इतर ठिकाणी उपक्रम करण्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे. विलास रबडे हा या शाळेचा माजी विद्यार्थी.त्याने हा उपक्रम सुरू केला, वाढवला आणि विशेष म्हणजे आता त्याच्याशिवायही नियमितपणे चालू राहील याचे उत्कृष्ट नियोजन केले. मला शाळा पुन्हा पूर्वीसारखी वाटू लागली. खूप आनंद झाला.
हे सर्व लिहिण्याचे कारण, माझ्या या शाळेतील माजी मित्र-मैत्रिणींनो, वेळ काढून जरूर शाळेत जा, जुन्या आठवणींना उजाळा द्या. ह्या आणि अशा अनेक उपक्रमांसाठी वेळ द्या, आर्थिक मदत द्या, तुमच्या मनात काही योजना असेल तर जरूर करा.
आपली शाळा वैभवपूर्ण इतिहासाची आहेच, त्यात आपला खारीचातरी वाटा टाकुया.